|| श्री लक्ष्मी नृसिंह महिमा||
|
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम |
धर्मासंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ||
या भगवंताच्या वचनांचा अनुभव नृसिंह अवतारात येतो. ब्रम्हदेवाच्या वराने उन्मत्त झालेल्या व सर्व मानव तथा देवादिकांना उपद्रवकारक व हानिकारक झालेल्या दानवेन्द्र हिरण्यकश्यप विनाशासाठीच भगवान महाविष्णूंनी हा नृसिंह अवतार धारण केला. हा अवतार अयोनिसंभव आहे. या अवतारातील स्वरूप व प्रकट-नाट्य पूर्णतया अदभूत व विलक्षण असे आहे. तसेच प्रकटीकरणानंतरचे या अवतार रूपातील भगवंताचे अवनितलावरील वास्तव्यही अल्पकालीन आहे. हिरण्यकश्यपाचा वध आणि भक्त प्रल्हादाचे राज्यरोहण कार्यकारण भाग संपताच भगवंतानी हा रौद्रभीषण उग्र अवताराची त्वरित समाप्ती केली आहे.
नृसिंह हा शौर्याचा देव आहे. दुष्टांचे निर्दालन आणि सज्जनांचे संरक्षण हा ह्या देवाचा महिमा आहे. नृसिंहाचे उग्र रूप त्याचे ध्यान करणार त्याला सर्व भुतांपासून, मृत्युपासून रक्षण करते.नृसिंह कथानकात विष्णूचे हे उग्र स्वरूप दाखविण्यमागे फार मोठा सामाजिक आशय आहे. समाजाची चांगल्या मार्गाने प्रगती व्हावयाची असल्यास, दृष्ट प्रवृतीचे निर्दालन करावयास हवे. म्हणूनच सामाजकंटकांना धाक वाटेल आणि सज्जनांना अभय मिळेल असे हे स्वरूप आहे.
हिरण्यकश्यपाचा वध म्हणजे अज्ञानाचा नाश असेही समीकरण मांडले जाते. अज्ञानामुळेहि माणूस मदांध होतो. ब्रम्हदेवाने दिलेल्या अमरत्वाच्या वरामुळे हिराण्यकश्यप परमेश्वरी शक्ती विषयी वृथाच अंधारात राहिला. कर्म, ज्ञान आणि भक्ती विसरला. आपल्या मर्यादा विषयीचे अज्ञान दूर करण्यास ते तयार होईना. भक्त प्रल्हाद विष्णू भक्तीच्या मार्गाने प्रकाश दाखवीत असूनही हिरण्यकश्यपाने डोळस व्हायचे नाकारले. शेवटी श्री विष्णूस असे उग्र स्वरूप धारण करणे भाग पडले.
नृसिंहाची जागृत स्थाने भारतात अनेक ठिकाणी आहेत. त्यापेकीच मावळंगे येथील देवस्थान.
|